लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : बालवयापासून जीवनाच्या सर्व अंगांचे शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकाला समाजाने पूजनीय मानले आहे, असे प्रतिपादन सुनीतादेवी नाईक यांनी केले.
येथील संत नामदेव मंदिरात शिक्षक दिनानिमित्ताने तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद सदस्या अश्विनी नाईक, नगराध्यक्षा सुनीता निकम, शिराळा महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षा साधना पाटील, नंदाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
साधना पाटील म्हणाल्या, पिढ्या घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. सुसंस्कृत पिढी घडल्यास समाजाला योग्य दिशा देऊन पुढे घेऊन नेते. त्यामुळे पिढ्या घडवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांवर मोठी जबाबदारी असते. ज्ञानदानाबरोबर समाजभान शिकवण्याचे काम ते करत असतात. अशा पिढ्या घडविणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.
प्रारंभी राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष ॲड. विलास झोळे यांनी स्वागत केले. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरपंचायत सभापती मोहन जिरंगे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, शहर अध्यक्ष सुनील कवठेकर, आर. बी. शिंदे, डी. एन. मिरजकर, राजू निकम, वंदना यादव, कल्पना गायकवाड, एस. एम. पाटील, आनंदराव चव्हाण, वैशाली कदम, अर्चना कदम आदी उपस्थित होते. अरुण पाटील यांनी आभार मानले.