सांगली , दि.६ : नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी अग्रणी नदी पुनरूज्जीवन आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम, कर्नाटकचे प्रशांत होन्नागोळ, अण्णासाहेब अडहळ्ळी, अॅड. संजय होनकांडे, सतीश अडहळ्ळी, रवी नागगूळ, धाराप्पा होन्नागोळ, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी उपस्थित होते.
राणा म्हणाले, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही खूप चांगली योजना आहे. ती शास्त्रीय पद्धतीने राबविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. या योजनेचे फलित सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. ही योजना शास्त्रीय पद्धतीने राबविण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही योजना शासनाची नव्हे, तर आपली सर्वांची आहे, असे मानून यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे.
कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सागर गवते, संपतराव पवार, जलबिरादरीचे नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, उदय गायकवाड, विलास चौथाई, श्रीपाद करंदीकर, कर्नाटकचे अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
अग्रणीचे उर्वरित काम तातडीने करू : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान आणि अग्रणी नदी पुनरूज्जीवन यांची कार्यपद्धती जलनीतीनुसार अनुसरून अग्रणी नदी प्रवाहित करण्यासाठी समन्वयाचा अभाव भरून काढून अपूर्ण कामे तात्काळ मार्गी लावू.
अग्रणी नदी पुनरूज्जीवन हे देशातील बेस्ट मॉडेल बनण्यासाठी प्रयत्न करू. तसेच, याकामी वाल्मी संस्थेची मदत घेऊ. जलसाक्षरतेसाठी यशदा संस्थेमध्ये कार्यशाळा घेऊ. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झालेल्या १४० गावांतील प्रत्येकी ५ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.