कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या हंगामात गाळपाला येणाऱ्या उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा देणार असल्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते.आमदार लाड म्हणाले, हंगाम सुरू होऊन ३१ दिवस झाले. आतापर्यंत १ लाख ९४ हजार टन ऊस गाळप झाले आहे. यंदा कारखान्याकडे १४ हजार हेक्टर ऊस नोंद आहे, यावरून १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढवून ९० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेने चालवणार आहोत.बँका, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक आणि कर्मचाऱ्यांची सर्व देणी वेळेत दिली आहेत. सभासद, ऊस उत्पादक, कामगार, संचालक मंडळ, अधिकारी यांनी सर्वतोपरी मदत केली तरच अडचणीत असलेले सहकार टिकू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदीतील जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.क्रांतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक ऊस विकास योजना आखल्या, यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. शेतकऱ्यांनी अभ्यासू वृत्तीने शेती केली तर उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ साधता येईल. कारखान्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले आहे, त्याचा फायदा शेतकऱ्याने घ्यावा, असेही ते म्हणाले.यावेळी संचालक महावीर चौगुले, संपतराव सावंत, आत्माराम हारुगडे, अरुण कदम, जयप्रकाश साळुंखे, आप्पासाहेब जाधव, अंकुश यादव, जयवंत कुंभार, शीतल बिरनाळे, अलका पाटील, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे उपस्थित होते.
सांगलीतील क्रांती कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजारांचा, आमदार अरुण लाड यांनी केले जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 1:14 PM