पलूस : रक्ताचा टिळा लावून झालेल्या क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड व क्रांतिविरांगना विजयाताई लाड यांच्या क्रांतिकारी विवाह सोहळ्याचे महानाट्य बुधवार, २५ मे रोजी कुंडल (ता. पलूस) येथे आयोजित करण्यात आले आहे. जी. डी. बापूंच्या जन्मशताब्दीनिमित्त या महानाट्याचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली.
साताराच्या प्रतिसरकारचे फिल्डमार्शल, थोर क्रांतिकारक जी. डी. बापू लाड आणि क्रांतिविरांगना विजयाताई लाड यांचा क्रांतिकारी विवाह २५ मे १९४५ रोजी रूढी-परंपरेला फाटा देऊन पुरोगामी पद्धतीने वधू-वरांनी एकमेकाला रक्ताचा टिळा लावून कुंडलच्या क्रांतीभूमीत पार पडला होता. आता बापूंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्या विवाहावर आधारित महानाट्याची रचना करण्यात आली आहे. हे महानाट्य बुधवार, २५ मे रोजी रात्री ८.३० वाजता कुंडल येथील प्रतिनिधी हायस्कूलच्या प्रांगणात सादर होणार आहे.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर आणणे, हा या महानाट्याचा उद्देश आहे. स्वावलंबन, स्वाभिमान आणि स्वदेशप्रेम ही बापूंच्या जीवनाची त्रिसूत्री होती. आजच्या पिढीला याचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे देशासाठी आयुष्य वाहिलेल्या बापूंनी आणि क्रांतिकारकांनी घडवलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुन्हा जनमानसात रुजवाव्यात, यासाठी क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली या महानाट्याचे आयोजन केले आहे.
या महानाट्याचे लेखक, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक राकेश सावंत आहेत. अशोक पवार, प्रा. सी. एल. रोकडे, मुख्याध्यापक सी. वाय. जाधव, प्राचार्य प्रताप लाड, उमेश पेठकर, ऋषिकेश खारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.