लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महागाईचा चटका सहन करावा लागलेल्या ग्राहकांना गेल्या पंधरवड्यपासून तांदळासह कडधान्याच्या दरातील स्वस्ताई अनुभवण्यास आली होती. मात्र, पुन्हा एकदा तांदळाचे दर वाढले असून, इतर किराणा मालाचे दरही वाढले आहेत. भाजीपाला दर आवाक्यात असून पालेभाज्यांची विक्रमी आवक होत आहे.
दिवाळीनंतर सलग महिनाभरापासून तांदळाचे दर घटत होते. बाजारात अचानक आवक वाढल्याने दरात घसरण झाली होती. बासमती, तुकडा, कोलम, तिबार आदींसह इतर तांदळाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या आठवड्यात प्रतिक्विंटल २५ ते ५० रुपयांनी दरवाढ झाली आहे. शाळू, हायब्रीडच्या दरातही वाढ झालेली आहे.
मेथी, कोथिंबीरीसह इतर पालेभाज्यांची आवक मोठी होत आहे. परिणामी दर घटले आहेत. संत्र्यांसह सफरचंद, कलिंगड, चिकूची आदी फळांची मार्केटमधील आवक वाढत असल्याने फळांच्या दरातही स्थिरता असली तरी त्यास ग्राहकांचा तितका प्रतिसाद नाही.