सांगली : जिल्ह्यातील २५०० शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तांदूळ संपल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरू होते. जिल्हा परिषद शिक्षण विभागामधील सर्व शिक्षा विभागाकडील अधिकाऱ्याच्या पाठपुराव्यास यश आले असून बुधवारी १०६३ टन तांदूळ मंजूर झाला आहे. यापैकी २५० टन तांदूळ २५०० शाळांना पाठविला आहे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या २५०० अनुदानित शाळांमधील २ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांमधील तांदूळ संपल्यामुळे मुलांचे हाल होत असल्याने तातडीने मिळावा, अशी विनंती शाळांच्या मुख्याध्यापकांनी केली होती. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानाकडील लेखाधिकारी यांनी अनेकवेळा शासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला होता. परंतु, तांदळाचा पुरवठाच होत नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार बंद होता. या पार्श्वभूमीवर लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शासनाकडून बुधवारी जिल्ह्यासाठी १०६३ टन तांदूळ मंजूर झाला असल्याची माहिती लेखाधिकारी महंमदसरवर मुल्ला यांनी दिली. तसेच बुधवारी लगेच २५० टन तांदूळ जिल्ह्यातील शाळांना पाठविला असून दोन दिवसात सर्व शाळांमध्ये पुरेसा तांदूळ पोहोच होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हुश्श.. सांगली जिल्ह्यातील २५०० शाळात तांदूळ आला, पोषण आहार झाला पुर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 3:51 PM