सहदेव खोत ।पुनवत : शिराळा तालुक्यात यंदा अति पावसाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. खरीप हंगामात हानी झालेल्या भात पिकाच्या कापणीनंतर शेतातील ओलीमुळे भात पिकाचे खोडवे आलेले पाहावयास मिळत आहे. या दुबार भाताला लोंब्याही आल्या आहेत. त्यामुळे भाताबरोबरच वैरणही शेतकºयांच्या पदरात पडणार आहे. परंतु पावसाने झालेले नुकसान भरून येणार नाही.
शिराळा तालुक्यात यावर्षी पावसाने उच्चांक नोंदवला. ऊस पिकाबरोबरच भात या खरीप पिकाची अपरिमित हानी झाली. अवकाळीने उरल्यासुरल्या धान्याची नासाडी झाली. भातापासून वैरण म्हणून मिळणारे पिंजर वाया गेले. शेतकºयांना दुहेरी फटका बसला. नोव्हेंबर उजाडेपर्यंत पाऊस पडल्याने काढणी करणे अवघड झाले. काढणीनंतर शेतात ओल कायम राहिल्याने अनेक ठिकाणच्या भातवाफ्यात खोडवा पीक उगवून आले आहे. रब्बी हंगाम लांबणीवर पडल्याने अनेक शेतक-यांनी भाताचे खोडवे तसेच राखले आहेत. भात आणि पिंजर फायद्यात पडेल म्हणून काहींनी खताची मात्रा दिली आहे.
अनेक ठिकाणी खोडवा भात नजरेस पडत आहे. दुबार पीक पोसवले आहे. त्यामुळे अशा शेतात काही तरी पदरात पडेल, अशी शेतकºयांना आशा आहे. परंतु अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरून येणार नाही. त्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे.
रब्बी हंगामात साधारण नोव्हेंबरच्या मध्यावर गहू, मका या पिकांची पेरणी होते. पेरणी वेळेत झाली तर ही पिके साधतात. पण यंदा हा काळ पुढे गेल्याने ही पिके आता यापुढे कितपत फायदेशीर ठरणार, ही चिंता सतावू लागली आहे.