सांगली : कासेगाव (ता. वाळवा) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. शिवीगाळ केली म्हणून मज्जिद युसूफ आत्तार (वय ६०, रा. कासेगाव, ता. वाळवा) यांचा हणमंत राजाराम पाटील (४४, रा. शेणे, ता. वाळवा) या रिक्षाचालकाने डोक्यात दगड घालून खून केला होता. संशयितास अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी आज, गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.मृत आत्तार शेणे येथील बहिणीकडे राहण्यास होते. २१ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास कासेगाव येथील राजारामबापू साखर कारखान्याजवळ गट कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर कासेगाव पोलिसांनी तपास सुरू केला होता. घटनेदिवशी आत्तार यांनी संशयित पाटील यास शिवीगाळ केली. याकडे पाटीलने दुर्लक्ष केले होते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा दोघांची भेट झाली. त्यावेळी पाटील याने शिवीगाळ का केली म्हणून विचारले असता, आत्तार यांनी पुन्हा शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात पाटीलने राग सहन न झाल्याने त्यांचा डोक्यात दगड घालून खून केला. याबाबत हणमंत पाटीलने खुनाची कबुली दिली असल्याचे गेडाम यांनी सांगितले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, कासेगावचे सहायक निरीक्षक अविनाश मते आदी उपस्थित होते.सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरेकासेगाव पोलिसांनी केलेल्या तपासात अज्ञाताने आत्तार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून पोलिसांकडून तपास सुरु होता. शेणे येथील संशयित हणमंत पाटील या रिक्षाचालकावर पोलिसांना संशय आल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या हणमंत पाटीलने नंतर खुनाची कबुली दिली.
सांगली जिल्ह्यातील कासेगावच्या खून प्रकरणाचा दोन महिन्यानंतर छडा, रिक्षाचालकास अटक
By शरद जाधव | Published: September 15, 2022 6:01 PM