सांगली : विश्रामबाग पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि चांगलाच चोप दिला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले होते. पण दंड न भरताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रिक्षासह त्याने धूम ठोकली.
रिक्षाचालक पोलिस ठाण्यातून पळून गेल्याचे लक्षात येताच ठाणे अंमलदाराला घाम फुटला. त्यांनी कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. मग पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याचा शोध सुरु ठेवला. तो विश्रामबाग चौकात सापडला. चौकापासूनच त्यांचा पोलिसांनी समाचार घेतला. पोलिस ठाण्यात आणूनही त्याला चांगलेच धोपटले. सोमवारी दुपारी अडीच वाजता घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईसाठी त्याला सकाळी पोलिस ठाण्यात आणले होते. त्याला ठाणे अंमलदाराच्या खोलीत बसवून ठेवले होते. परत त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. पोलिस त्यांच्या कामात व्यस्त होते. रिक्षाचालकाने दुसरी किल्ली मागून घेतली. कानोसा घेत तो दुपारी अडीचच्या सुमारास चोरपावलाने ठाण्याबाहेर आला. रिक्षा काढून भरधाव वेगाने पोलिस ठाण्यासमोरुन गेला. पोलिसांची धावपळ उडाली. विश्रामबाग चौकापर्यंत पाठलाग करुन त्याला पकडले.