सांगली : वेगवेगळ्या कारवायांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षांहून अधिक काळ पडून आहेत. त्यातील निम्म्या रिक्षा महापुरात बुडाल्याने सडल्या आहेत, तर उर्वरित रिक्षा वापराअभावी गंजू लागल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.
रिक्षाचालक संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रिक्षा त्वरित सोडण्याची मागणी केली. सांगली-मिरजेत नियमभंगाच्या कारणांनी आरटीओतर्फे वेळोवेळी रिक्षा जप्त केल्या जातात. दंड ठोठावला जातो. दंड भरेपर्यंत त्या ताब्यात ठेवल्या जातात. त्या ठेवण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे जागा नसल्याने एसटीच्या जागेत ठेवल्या जातात. सांगलीत एसटी आगारात व मिरजेत चंदनवाडी कार्यशाळेच्या आवारात दोन वर्षांपासून पाचशेहून अधिक रिक्षा अशाप्रकारे पडून असल्याची माहिती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले यांनी दिली.वापराअभावी त्या गंजू लागल्या आहेत. इंजिने निकामी होताहेत. सांगलीत महापूर काळात एसटी आगारात चार फुटांहून अधिक पाणी साचले होते. त्यामध्ये रिक्षांची धूळदाण झाली. बॉडी, इंजिन, कोचिंगसह दिव्यांची वासलात लागली. रिक्षाचालकांना लाखोंचा फटका बसला.
काही व्यावसायिकांनी दंड भरुन रिक्षा सोडविण्याचा प्रयत्न केला, पण एसटीने अडविले.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले, अरीफ शेख, सलीम मलीदवाले, नीलेश चव्हाण, मोहसीन पटवेगार, जावेद पटवेगार, संजय बन्ने, बाळू खतीब, बिरु ऐवळे आदी उपस्थित होते.भुईभाड्यावर जीएसटीरिक्षा ठेवण्यासाठी जागा दिल्याबद्दल एसटीने प्रतिदिनी पन्नास रुपयांचे भुईभाडे आकारले आहे. त्यावर १८ टक्के जीएसटीदेखील आकारला आहे. हा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा... असल्याची भावना रिक्षा संघटनांनी व्यक्त केली. भुईभाडे आणि जीएसटी माफ करुन रिक्षा ताब्यात देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली.