शीतल पाटील, सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज योजनेची वाट लागली आहे. ठेकेदारांच्या थकीत बिलावरून गेली दीड वर्ष वाद सुरू आहे. कामाची प्रगती दाखविल्याशिवाय बिल देऊ नये, असा रेटा नगरसेवकांनी लावला आहे. त्यात विद्यमान आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही गेल्या महिन्यात बैठक घेऊन ठेकेदाराची झाडाझडती घेतली. बैठकीत अपूर्ण कामांचा मुहूर्त ठरला, पण अद्याप या कामांना म्हणावी तितकी गती घेतलेली नाही. त्यात आता ठेकेदारांचे थकीत बिल अदा करण्याची घाई प्रशासनाला झाली आहे. बिल मिळाल्यानंतर तरी ठेकेदार गतीने काम करणार का? अशी शंका साऱ्यांच्या मनात आहे. सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजना दोनशे कोटींच्या घरात पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे. कामाची मुदत दोन वर्षाची असतानाही ५० टक्क्यापेक्षा जादा काम झालेले नाही. मिरजेत ६६ किलोमीटर पाईपलाईन, टिंबर एरिया येथे पंपगृह, समतानगर येथे पंपगृहाचे काम प्रस्तावित आहे. आॅक्सिडेशन पॉँडचे काम ३० टक्के झाले आहे, तर ३९ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. गेल्या मार्चपासून ड्रेनेजचे काम बंद झाले आहे. मिरजेतील रायझिंग मेनचे काम अर्धवट आहे. सांगलीतील ज्योतिरामदादा आखाड्याजवळील पंपगृह, आॅक्सिडेशन पॉँडचे काम अपूर्ण आहे. ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधित योजना पूर्ण होईल, याविषयी अजूनही शंकाच आहे. आॅक्सिडेशन पॉँड, पंपगृहापासून कामाला सुरुवात करण्याची गरज होती, पण ठेकेदार व जीवन प्राधिकरणाने वाट्टेल तिथे पाईप पुरल्या आहेत. या वाहिन्याही कार्यान्वित झालेल्या नाहीत. योजनेचे सल्लागार असलेल्या जीवन प्राधिकरणाकडून चांगल्या पद्धतीने सुपरव्हिजन होत नाही. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे महापालिकेला नागरिकांची नाराजी ओढावून घ्यावी लागत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून ठेकेदाराने चार कोटींच्या बिलासाठी योजनेचे काम बंद ठेवले आहे. या बिलाबाबत गेली दीड वर्षे वाद सुरू आहे. बिले अदा केल्यानंतर ठेकेदार गतीने काम करेल, याविषयीच पदाधिकारी, नगरसेवकांत शंका आहे. त्यात दोनशे कोटींच्या योजनेतील चार कोटीचे बिल थकले म्हणून बिघडले कुठे? असा सवालही केला जात आहे. ठेकेदाराला बिले देण्यास नगरसेवकांची हरकत नाही, पण त्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह असल्याने योजनेची कामे रखडतील, अशी भीतीही आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही गेल्या महिन्यात बैठक घेऊन ठेकेदार व जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली होती. या बैठकीत मिरजेतील टिंबर एरियात पंपगृह, आॅक्सिडेशन पाँडचे काम पंधरा दिवसात सुरू करण्यासह शासकीय दूध डेअरी-बसस्थानक ते टिंबर एरियापर्यंतची चार किलोमीटर पाईपलाईन, सांगलीतील जोतिरामदादा आखाड्याजवळील पंपगृह व आॅक्सिडेशन पाँड, रेल्वे क्रॉसिंगसाठी प्रस्ताव यासह विविध विषयांवर चर्चा होऊन कालमर्यादा निश्चित करण्यात आली. काम सुरू करा, मग बिले देऊ, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली. पण सध्या सांगलीच्या आॅक्सिडेशन पाँडचे काम सुरू झाले आहे. उर्वरित कामाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. मिरजेतील पंपगृहाच्या जागेची निश्चिती होऊ शकलेली नाही. तरीही ठेकेदाराचे थकीत चार कोटी रुपयांचे बिल काढण्यासाठी मात्र प्रशासकीय स्तरावर घाईगडबड सुरू आहे.
ड्रेनेज ठेकेदारांच्या बिलासाठी घाई...
By admin | Published: August 15, 2016 1:19 AM