वाळवा : काय ती झाडी, काय ते डोंगार, काय हाटील अशी डायलॉगबाजी म्हणजे जबाबदार लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची उडवलेली खिल्ली आहे. अशी वक्तव्ये करताना त्यांना शरम वाटायला पाहिजे होती. भारतीय लोकशाहीत मनमानीला स्थान नाही. पण आज सरकारकडून लाेकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत केवळ मनमानी कारभार सुरू आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू लेखक, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी केले.
वाळवा येथे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष के. जी. पाटील, लेखक, विचारवंत ज्ञानेश महाराव, वैभव नायकवडी, प्रा. डाॅ. बाबूराव गुरव, प्राचार्य आर. एस. चोपडे, ॲड. सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गांधी म्हणाले, राम मंदिराच्या भावनिक विषयावर सत्ताबदल घडवून आणण्यात आला. यामुळे आजच्या राज्यकर्त्यांना राष्ट्र, राज्य व जनतेच्या हिताचे सोयरसुतक नाही. यामुळे समाजामध्ये एक प्रकारची उदासीनता येत आहे. हे राेखण्यासाठी महाराष्ट्रात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिसरकारची पुन्हा एकदा गरज आहे. न्याय व समता यासाठी लढणाऱ्यांना आज एकामागून एक संपवले जात आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे. लोकशाहीत राजद्रोह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशद्रोह आणि राजद्रोह हे पूर्णतः वेगळे आहे. मात्र याबाबत जनतेमध्ये भीती पसरवली जात आहे.