तासगाव : महसूल विभागाचे पथक गस्त घालत असताना, येरळा नदीपात्रात राजापूर (ता. तासगाव) येथे रायफल सापडली. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळावर दाखल झाले. मात्र रायफल खराब असल्याने पोलिसांनी ही घटना अदखलपात्र ठरवत गुन्ह्याची नोंद केली नाही. मात्र गस्त पथकावर जरब बसविण्यासाठीच वाळू माफियांनी ही रायफल ठेवली असावी, अशी चर्चा होती.येरळा नदीपात्रातील वाळूची चोरी होऊ नये, यासाठी येळावीचे मंडल अधिकारी अभयकुमार शेटे यांच्या नेतृत्वाखाली येळावी, निमणी, राजापूर, ढवळी, तुरची येथील तलाठ्यांचे पथक रात्रीच्या सुमारास सातत्याने गस्त घालत असते.
राजापूर येथील येरळाकाठावर रात्री बाराच्या सुमारास नेहमीची गस्त असायची. मात्र बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास हे पथक गस्तीसाठी आले. येरळाकाठावरुन गस्त घालत असताना, नदीपात्राकडेलाच रायफल पडली असल्याचे निदर्शनास आले.रायफल दिसल्यानंतर मंडल अधिकारी शेटे यांनी ही माहिती तहसीलदारांना सांगितली. त्यानंतर पोलीसपाटील रेश्मा जाधव यांनी ही माहिती तासगाव पोलिसांना कळवली. रायफल सापडल्याची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक अजय सिंंदकर यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत, रायफल जप्त केली. मात्र सापडलेली रायफल नादुरुस्त आणि निकामी असल्याने पोलिसांनी याबाबत नोंद केली नाही.दहशतीसाठी वापर केल्याचा अंदाजयेरळा नदीकाठावर वाळू माफियांकडून सातत्याने वाळूचोरीचे कारनामे सुरु आहेत. वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने गस्ती पथकाच्या माध्यमातून नजर ठेवली आहे. त्यामुळे वाळू माफियांना वाळू चोरणे मुश्किल झाले आहे. त्यामुळेच वाळू माफियांनी रायफलच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले असावे, असा संशय व्यक्त होत आहे.