मिरज : देशाला भ्रष्टाचाराच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी माहितीचा अधिकार प्रभावीपणे राबविण्याची व माहिती अधिकाराचा गैरवापर रोखण्याची गरज असल्याचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सांगितले. मिरजेत डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे ‘माहिती अधिकार-भ्रष्टाचार रोखण्याचे साधन’ व पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘अपारंपरिक ऊर्जा व व्यावहारिक साधनांचा आर्थिक उपयोग’ या विषयावर आयोजित संयुक्त चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्याहस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. पाटील होते.साळुंखे म्हणाले की, आर्थिक चारित्र्य हा भ्रष्टाचाराला रोखणारा एक प्रभावी मार्ग आहे. माहिती अधिकारामुळे भ्रष्टाचाराला प्रतिबंध करता येणे शक्य आहे. आपला देश तीनशे वर्षांच्या मोगलाईच्या, तर दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. मात्र देश भ्रष्टाचारमुक्त करणे सर्वांसमोरील आव्हान आहे. डॉ. बापूजी साळुंखे यांनी आपल्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात सात्त्विक व सकारात्मक विचारांचा ध्यास घेऊन शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक क्रांती घडविली. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, वाढत्या औद्योगिक विकासामुळे जगात ऊर्जेची आवश्यकता वाढत आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांचे साठे संपत असल्याने सौरऊर्जा, अन्य अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे अपरिहार्य ठरले आहे. डॉ. प्राचार्य अनिल पाटील यांनी स्वागत केले. डॉ. जे. एल. भोसले व प्रा. विलास साळुंखे यांनी भूमिका मांडली. मिलिंद सुतार यांनी आभार मानले. उद्या, शनिवारी सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप होणार आहे. (वार्ताहर)
भ्रष्टाचार मुक्तीसाठी माहिती अधिकार हवा
By admin | Published: December 13, 2014 12:00 AM