मिरज : काँग्रेस, राष्ट्रवादीआघाडीने मिरज मतदारसंघ जनता दलासाठी सोडण्याची मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीप्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेत्यांकडे केली आहे. मिरजेची जागा जनता दल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार असल्याचा दावा प्रा. शरद पाटील यांनी केला. मिरजेच्या जागेवर जनता दलाने हक्क सांगितल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छुक धास्तावले आहेत.मिरज विधानसभा मतदारसंघातून जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील दोनवेळा निवडून आले. पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद पाटील निवडून आले. त्यानंतर मिरज विधानसभा राखीव झाल्यानंतर जनता दलाला येथे प्रबळ उमेदवार मिळाला नव्हता. मात्र यावेळी जनता दलाने काँग्रेस, राष्ट्रवादीआघाडीकडे मिरजेची जागा मागितली आहे.जनता दलाची काँग्रेस आघाडीसोबत युती असून, मिरजेसह राज्यात दहा जागांची मागणी केल्याचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितले. मिरज विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केल्याने प्रत्येक गावात जनता दलाचे कार्यकर्ते व मतदार आहेत.
यापूर्वी प्रा. शरद पाटील यांनी पुणे पदवीधर मतदार संघात भाजपची मक्तेदारी मोडीत काढून प्रकाश जावडेकर यांना पराभूत केले होते. त्याचप्रमाणे मिरजेत भाजपच्या भांडवलदार व धनाढ्य उमेदवारासोबत जनता दल तुल्यबळ लढत देऊ शकतो, असा दावा काही दिवसांपूर्वी मिरजेत जनता दलाच्या मेळाव्यात करण्यात आला होता.गतवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी उमेदवाराची आनामत रक्कम जप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर जनता दलाने मिरजेच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाली असून, मिरजेची जागा जनता दलाला सोडण्यात येणार असल्याचा दावा प्रा. शरद पाटील यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना, आघाडीतर्फे मिरजेत जनता दलाचा उमेदवार देण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीइच्छुक संभ्रमात आहेत.