सांगली : गणेश मुर्तीच्या स्टाॅलमुळे गजबजलेला कर्मवीर चौक...वेळ सायंकाळी पाचची... गणरायाला घरी नेण्यासाठी आलेल्या भक्तांची मोठी गर्दी... त्यात दहा ते बारा जण ‘हमारी मांगे पुरी करो’, च्या घोषणाबाजी देऊ लागले. तेवढ्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा चौकात दाखल झाला. पोलिसावर आंदोलकांनी हल्ला केला. अश्रुधुराच्या नळकाड्या पोलिसांनी फोडल्या आणि पांगापांग झाली. हा सारा प्रकार राहून चौकातील लोकांची धाकधुक वाढलेली. कोणाला काहीच समजतं नव्हते. मात्र काही वेळातच पोलिसांचे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक असल्याचे सर्वांनी सुटकेचा सुसारा सोडला आणि क्षणार्धात वातावरण बदलले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. पोलिस यंत्रणा अलर्ट असून उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी विविध उपाययोजनाही केल्या आहेत. सोमवारी कर्मवीरचौकात पोलिसांकडून दंगल नियंत्रण प्रात्याक्षिक करण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांगली विभागाचा यात समावेश होता. निरीक्षक संजय मोरे, अभिजीत देशमुख, शिवाजी गायकवाड यांच्यासह पथके तैनात होती. दंगल नियंत्रण पथकाची स्वतंत्र टीम घटनास्थळी दाखल होती.
कायदा व सुव्यवस्था कायम राखून परिस्थिती कशी हाताळली जाते, हे सांगलीकरांनी पाहिले. आधी आंदोलकांना शांततेचे आवाहन करण्यात आले. परंतु परिस्थिती हाताबाहेर जाताच अश्रुधुरासह पोलिस बळाचा वापर करण्यात आला. या प्रात्याक्षिकानंतर उपाधीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर चौकातून पोलिसांनी संचलन काढले. सण, उत्सव शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरे करा, असे आवाहन पोलिस दलाने केले.