सांगली : लॉकडाऊनमुळे शेतीमालाची कवडीमोल दराने विक्री होत असतानाच रासायनिक खत कंपन्यांनी अनुदान बंद केल्याच्या नावाखाली खताच्या किमतीत ५० किलोच्या पोत्यासाठी ४०० ते ७१५ रुपयांची वाढ केली आहे.
लॉकडाऊनाचा शेतीमालाच्या दरावर परिणाम झाला आहे. दर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यातच खरीप हंगामाची पेरणी जवळ आल्यामुळे रासायनिक खते, बियाणे खरेदीची लगबग चालू आहे; पण खतांच्या किमती वाढल्या आहेत.
केंद्र सरकारने खताच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान बंद केले आहे. यामुळे रासायनिक खतांचे दर वाढल्याचे दिसत आहेत, असे स्पष्टीकरण रासायनिक खत विक्रेते देतात. इफको कंपनीच्या १०:२६:२६ या रासायनिक खताच्या ५० किलोच्या पोत्याचा दर एक एप्रिलपूर्वी ११७५ रुपये होता. त्यात ६०० रुपयांची वाढ होऊन १७७५ रुपये दर झाला आहे. १२:३२:१६ या खताचा दर ११९० रुपयांवरून १८०० रुपये झाला आहे. डीएपीचा दर ११८५ रुपयांवरून १९०० रुपये झाला आहे. प्रति ५० किलो पोत्यास ७१५ रुपये दरवाढ झाली आहे. आयपीएल कंपनीच्या डीएपीचीही ६५० रुपयांनी दरवाढ झाली आहे. सर्वच कंपन्यांच्या खतांचे दर ३०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत.
चौकट
कच्च्या मालाचे दर वाढल्याचा परिणाम
फॉस्फरिक ॲसिडसह रासायनिक खत तयार करण्यासाठीच्या कच्चा मालाच्या किमती वाढल्यामुळे दर वाढले आहेत. केंद्र शासनाकडून कंपन्यांना मिळणारे अनुदानही बंद झाल्याचाही परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया ॲग्रिकल्चर इनपूट डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय निल्लावार यांनी दिली.
चौकट
रासायनिक खतांचे ५० किलाेचे दर
खतांचा प्रकार जुने दर नवीन दर
इफको
१०:२६:२६ ११७५ १७७५
१२:३२:१६ १२३५ १८००
२०:२०:० ९७५ १३५०
डीएपी ११८५ १९००
आयपीएल कंपनी
डीएपी १२५० १९००
२०:२०:० ९७५ १४००
पोटॅश ८५० १०००
महाधन कंपनी
१०:२६:२६ १२७५ १९२५
२४:२४:० १३५० १९००
२०:२०:०:१३ १०५० १६००
जीएसएफसी सरदार
१०:२६:२६ ११७५ १७७५
१२:३२:१६ ११९० १८००
२०:२०:०:१३ १००० १३५०
डीएपी १२०० १९००
सुपर फॉस्फेट ३७० ४७०