सांगली - देवल स्मारक मंदिराच्यावतीने दिला जाणारा यंदाचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते ऋषिकेश बोडस यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद बापट व चंद्रकांत धामणीकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
बापट म्हणाले की, येत्या १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हरीपूर (ता. मिरज) येथे कृष्णा-वारणेच्या संगमावरील सिद्धेश्वर मंदिरात देवलांच्या ऐतिहासिक पारावर पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचठिकाणी सोहळ्यापूर्वी नाट्यगीतांचा कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. बोडस यांना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी महापौर सौ. संगीता खोत उपस्थित राहणार आहेत. देवल स्मारक मंदिराची स्थापना १ जानेवारी १९२७ रोजी झाली आहे. देवलांच्या प्रेमाखातर सांगलीतील काही नाट्यप्रेमींनी कै. गणपतराव बोडस यांच्याहस्ते स्मारक मंदिराचे बीजारोपण केले. पूर्वी स्वातंत्र्यसैनिकांना संस्थेमार्फत सहकार्य केले जायचे. त्यानंतर विविध सामाजिक कार्यक्रम संस्था राबवित होती. कालांतराने बदल होत कलेच्या प्रांतात देवल स्मारक मंदिराने संपूर्ण देशभर नावलौकिक मिळविला.
संस्थेच्या कलाकारांनी आजपर्यंत एक रुपयासुद्धा मानधन न घेता स्वखर्चाने नाट्यस्पर्धा व प्रयोग सादर करण्याचे काम केले. त्यातून एक लाखाचा फंड जमा झाला आहे. त्यातून येणाºया व्याजातून पुरस्कार दिला जातो. अशा या संस्थेचा पुरस्कार संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा समजला जातो. देवल यांच्या जन्मदिनी १३ नोव्हेंबर रोजी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा घेण्यात येतो. सव्वाशे वर्षापूर्वी ज्या ऐतिहासिक पारावर संगीत शारदा नाटकाचा जन्म देवलांच्या हस्ते झाला त्याठिकाणीच यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा होत असल्याने यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
पारावर संगीत कार्यक्रम
देवलांच्या ऐतिहासिक पारावर १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. देवल संस्थेचे कलाकारच हा कार्यक्रम सादर करणार आहेत. देवलांच्या नाटकातील बहुतांश नाट्यगीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन बापट व धामणीकर यांनी यावेळी केले.
आजवरचे पुरस्काराचे मानकरी
भालचंद्र पेंढारकर, ज. शं. वाटाणे, जयमाला शिलेदार, प्रसाद सावकार, शरद गोखले, रामदास कामत, पं. तुळशीदास बोरकर, कान्होपात्रा किणीकर, शांताराम सुर्वे, शिवराम राड्ये, मास्टर अविनाश, विनायकराव थोरात, अरविंद पिंपळगावकर, चंद्रकांत डेग्वेकर, मधुवंती दांडेकर, नाना मुळे, श्रीमती फैय्याज, किर्ती शिलेदार आदी कलाकारांना तसेच सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.