सांगली : कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांच्या बोटांच्या ठशांद्वारे धान्य वितरणास परवानगीची मागणी रेशनिंग फेडरेशनने केली आहे. ठशांमुळे कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचा दावा संघटनेने केला आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांना संघटनेने निवेदन पाठविले आहे. त्यात म्हंटले आहे की, शिधापत्रिकाधारकाला धान्य घेण्यासाठी पॉस यंत्रावर बोटांचा ठसा उठवावा लागतो. सध्या कोरोनाच्या काळात ही प्रक्रिया सर्वांसाठीच धोकादायक आहे. पॉस यंत्राच्या वापरातून व ठशांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी ग्राहकाचे ठसे घेण्याची सक्ती कोरोना काळापुरती रद्द करावी.केंद्र शासन व राज्य शासन सर्वसामान्यांना जगविण्यासाठी धान्य वाटप करत आहे, त्याच पद्धतीने रास्त भाव धान्य दुकानदारांनाही जगविण्याची जबाबदारी सरकारनेच घेतली पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत धान्य वितरण करणार्या अनेक दुकानदारांना कोरोनाचा संसर्ग झाला, राज्यभरात १०० हून अधिक दुकानदार दगावले. तरीही जीवाची पर्वा न करता धान्याचे वाटप सुरु ठेवले होते. मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या वारसांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.सध्याची कोरोनाची लाट अधिक तीव्र आणि गंभीर आहे. या काळात दुकानदारांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यासाठी येतात. त्यांच्यापासून दुकानदारांनाही संसर्गाची भिती आहे. पॉस यंत्रावर बोटांचे ठसे उमटविल्याने अन्य ग्राहकांनाही संसर्ग होऊ शकतो.
हे लक्षात घेता कोरोनाची लाट संपेपर्यंत ग्राहकांच्या ठशांची सक्ती रद्द करावी. दुकानदाराचाच ठसा वापरुन धान्य वितरणासाठी परवानगी द्यावी. फेडरेशनचे सांगली जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, उपाध्यक्ष प्रभाकर कुरळपकर, शहराध्यक्ष रमजान बागवान, सचिव जयसिंग देसाई आदींनी निवेदने पाठविले.