इस्लामपूर येथील आरआयटी महाविद्यालयास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी भगतसिंह पाटील, आदित्य पाटील, डॉ. अभिजित शहा उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून गौरविण्यात आले, तर नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे नवभारत एज्युकेशन समुहामार्फत आयोजित शैक्षणिक संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते भगतसिंह पाटील यांनी हा बहुमान स्वीकारला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
भगतसिंह पाटील म्हणाले, आरआयटी ही विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करणारी संस्था आहे. यापुढील काळात आणखी उत्तम दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थी विकास या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून भविष्यातील वाटचाल सुरू आहे.
संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी म्हणाल्या, या पुरस्काराचे खरे मानकरी हे महाविद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी आणि सर्व शिक्षक आहेत. भविष्यात आरआयटीला आणखी मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
सचिव आर. डी. सावंत यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी आदित्य पाटील, प्रा. डॉ. अभिजित शहा उपस्थित होते.