सांगली : कृष्णा नदीचे सांगलीतील पात्र कोरडे ठणठणीत पडल्यानंतरही, सांगली शहराला पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. जॅकवेलअंतर्गत नदीत असलेल्या इंटक वेलच्या ठिकाणी खुदाई करून पाणीपुरवठा विभागाने केलेला प्रयोग यशस्वी झाला आणि शहराच्या उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. सांगलीची कृष्णा नदी कोरडी पडली की, शहराचा पाणीपुरवठा बंद होतो, याचा अनुभव यापूर्वी वारंवार येत होता. यंदाही अशीच स्थिती सांगली शहरात निर्माण होण्याची चिन्हे होती. महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये यांनी जॅकवेल, इंटक वेलची पाहणी केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुरेशी माहिती घेतली आणि इंटक वेलच्या ठिकाणी प्रयोग करण्याचे ठरले. इंटक वेलच्या पश्चिम बाजूस खोलगट भाग तयार झाल्याने, पाणी पातळी कमी झाली की इंटक वेलपर्यंत पाणी न पोहोचता खोलगट भागातून ते पुढे जात होते. त्यामुळे पात्राचे पाणी इंटक वेलकडून पुढे जाण्याची गरज होती. त्यासाठीच नदी कोरडी पडल्यानंतर त्याठिकाणी हा प्रश्न सोडविण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला. इंटक वेलच्या दिशेने पाण्याचा प्रवाह कायमस्वरूपी रहावा, म्हणून पात्रात तसा मार्ग तयार करण्यासाठी सुरुवातीला जेसीबी आणि नंतर पोकलॅनचा वापर करण्यात आला. हे काम गाळात तसेच चिखलमातीत करावे लागणार असल्याने कठीण होते. पोकलॅन कर्मचारीही त्यासाठी तयार नव्हते. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिल्यानंतर त्यांनी या कामात सहभाग घेतला. पोकलॅनच्या साहाय्याने बारा तासाहून अधिक काळ काम करीत इंटक वेलच्या दिशेने प्रवाहासाठी एक मार्ग तयार करण्यात आला आणि कोयना धरणातून सोडलेले पाणी येण्यापूर्वीच ही योजना यशस्वी झाली. काही दिवसांपूर्वी हा प्रयोग पूर्ण झाला असला तरी, त्याचे प्रत्यक्ष परिणाम गेल्या काही दिवसात दिसत आहेत. नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले असले तरी, इंटक वेलमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होत आहे. (प्रतिनिधी)
नदी कोरडी, तरी मिळतंय सांगलीला पाणी!
By admin | Published: February 25, 2016 1:22 AM