दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर हरितक्रांतीच्या पर्वाला सुरूवात झाली असून, टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णामाईच्या पाण्याने दुष्काळी भागातील ‘अग्रणी’ नदी खळाळली आहे. त्यामुळे या भागातील बळीराजा चांगलाच सुखावला असून, दुष्काळी घाटमाथ्याला आता ‘टेंभू’ने चांगलाच आधार दिला आहे.भूड (ता. खानापूर) येथील टेंभूच्या पाचव्या टप्प्यातून बलवडी (खा.) जवळ अग्रणी नदीपात्रात दररोज ५ दशलक्ष घनफूट पडणाºया कृष्णेच्या पाण्याने अग्रणी नदीपात्रातील सिध्देवाडीपर्यंतचे २५ हून अधिक बंधारे तुडुंब भरून तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी तलावापर्यंतचा पाण्याचा प्रवास पूर्ण झाला आहे. दुष्काळी खानापूरच्या घाटमाथ्यावर लुप्त झालेली अग्रणी नदी लोकसहभाग आणि शासनयंत्रणेद्वारे पुन्हा पुनरुजीवित झाली. शासनयंत्रणा आणि लोकसहभागाचा सुरेख संगम तयार करून अग्रणीचे खोलीकरण व रूंदीकरण करून घेण्यात आले.खानापूर तालुक्याच्या हद्दीत २० कि.मी., तासगाव तालुक्यात १७, तर कवठेमहांकाळ तालुक्यात २४ कि.मी. नदीपात्र असलेल्या या अग्रणी नदीवर सध्या ४७ सिमेंट बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात आले. टेंभू योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्यातून आलेल्या पाण्यातून बलवडी (खा.) हद्दीतील अग्रणी नदीपात्रात दररोज ५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील सर्व बंधारे भरून हे पाणी तासगाव तालुक्यातील सिध्देवाडी तलावात दाखल झाले आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील या नदीकाठावरील अनेक गावांतील बळीराजा तर सुखावला आहेच, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाईही दूर होऊ लागली आहे. त्यामुळे टेंभूच्या माध्यमातून दुष्काळी खानापूरच्या या घाटमाथ्यावर आता हरितक्रांतीची बीजे रोवली जाणार आहेत.‘अग्रणी’ची अख्यायिकाखानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे अग्रणी नदीचा उगम झाला आहे. अगस्ति ऋषी येथून कृष्णा नदीस रोज स्नानासाठी जात होते. हा परिसर दंडकारण्यात मोडतो. अगस्ति ऋषींना प्रसन्न होऊन कृष्णा नदी तामखडीपर्यंत आली. परंतु, अगस्ति ऋषींना या गोष्टीचा गर्व झाल्याने, कृष्णा नदी स्वस्थानी निघून गेली. तेथूनच उत्तरेस अग्रणी नदी प्रकट झाली, अशी अख्यायिका सांगितली जाते. आता टेंभूच्या माध्यमातून हीच कृष्णा नदी पुन्हा अग्रणीतून घाटमाथ्यावरील बळीराजाला संजीवनी देण्यासाठी वाहू लागल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
घाटमाथ्यावरील अग्रणी नदी कृष्णेच्या पाण्याने खळाळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:37 PM