इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी सकाळी जोरदार सरी कोसळल्या. चांदोली आणि वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी वारणा आणि कृष्णा नदीकाठाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिकुर्डे आणि ऐतवडे खुर्द येथील नदीकाठच्या परिसरातील ग्रामस्थांचे आणि जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
पावसाच्या संततधारेमुळे सगळे जनजीवन ठप्प झाले होते. बहे आणि बोरगाव येथील बंधारे पाण्याखाली गेले होते. कोयनेतील पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी बहे, रेठरे हरणाक्ष आणि ताकारी येथील पुलावरील पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खालीच होती. मात्र, तरीही सतत पडणारा पाऊस आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने पहिल्या टप्प्यात बाधित होणाऱ्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तहसीलदार सबनीस म्हणाले, ऐतवडे खुर्द येथील पर्बतवाडी, चिकुर्डे येथील भोसलेवाडीच्या काही कुटुंबांचे आणि जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कणेगाव, भरतवाडी, बहे, बोरगाव, ताकारी परिसरात भेटी देऊन येथील ग्रामस्थांनाही दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठच्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल यांच्यासह ग्रामसुरक्षा समित्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोट
वाळवा तालुक्यात सततचा पडणारा पाऊस आणि चांदोली व कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. दोन-तीन दिवसांत पाणी पातळीत कमालीची वाढ होईल. अशा वेळी नागरिकांनी पूरसदृश पाणी पाहण्यासाठी नदीपात्राकडे जाऊ नये.
- रवींद्र सबनीस, तहसीलदार, इस्लामपूर