सांगली : भरधाव मोटार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कामेरी (वाळवा) गावानजीक वेदांत मंगल कार्यालयासमोर ही दुर्घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व जण चाकण येथील रहिवासी आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कामेरी (सांगली) येथे गुरुवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
धनंजय पठारे (वय 28), दत्ता जाधव (25 वर्ष) व अमोल लक्ष्मण मुंगसे (वय 24 वर्ष) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमी झालेल्या धीरज विजय मुंगसे (२१, बिरजवाडी) व रुपेश गणपती पठारे (२५, पठारेवाडी) यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांच्या हात, पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताचे वृत्त समजताच मृत व जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे.
मृत व जखमी तरुण मित्र व जवळचे नातेवाईक आहेत. ते नृसिंहवाडी येथे श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी बुधवारी रात्री आले होते. मंदिर परिसरातच त्यांनी मुक्काम केला. गुरुवारी पहाटे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते मोटारीने (क्र. १४ एफएम ४०४७) पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. धनंजय पठारे हा मोटार चालवत होता. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कामेरी गावाजवळ गेल्यानंतर धनंजयचा मोटारीवरील ताबा सुटला.
त्यामुळे भरधाव मोटार जोरात झाडावर जाऊन आदळली. यामध्ये धनंजय पठारे, अमोल मुंगसे जागीच ठार झाले, तर दत्ता जाधव याचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कुरळप पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.