सांगली : वाहतूक नियमांविषयांविषयी जनमानसात जनजागृती व्हावी व नियमांची ओळख व्हावी या उद्देशाने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात येते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस दल यांच्यातर्फे ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त येत्या सोमवार (दि. १८)पासून जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी बुधवारी दिली.
आरटीओ व पोलीस दलाच्या वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानाचे नियोजन केले जाते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रम वगळून सोमवारी दुचाकी रॅलीने अभियानास सुरुवात होणार आहे. सध्या शाळा बंद असल्याने वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येणार आहे; तर काही निवडक शाळांमध्ये लेखी स्पर्धाही घेतली जाणार आहे. वाहतुकीच्या नियमांच्या माहितीबरोबरच हेल्मेटविषयी प्रबोधन केले जाणार आहे. साखर कारखाना तळावर वाहनधारकांना नियमांची माहिती देत वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
कांबळे म्हणाले, गेल्या वर्षभरात अपघातांच्या घटनांमध्ये २४ टक्क्यांनी घट झाली आहे. अपघातामधील मृत्यूचेही प्रमाण आठ टक्क्यांनी कमी झाले आहे. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटची ३६ ही संख्या कायम असून प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत नागरिकांनीही सहभाग नोंदवावा.