सांगली : विजेच्या दिव्यांचा लखलखाट, पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, हवेतील मंद गारवा अशा वातावरणातही सांगलीत सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते.शनिवार व रविवार सलग सुट्यांचे दिवस असल्याने गर्दी वाढली होती. सोमवारी पाचव्यादिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर देखावे पाहण्यासाठी आणखी गर्दी वाढणार आहे. गणराय व गौरींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर गणेशोत्सवातील आनंद द्विगुणित होत आहे. शनिवारी रात्री तर शहरात सर्वच प्रमुख चौकात मोठी गर्दी होती. विशेषत: कॉलेज कॉर्नर ते पटेल चौक रस्त्यावर मोठी गर्दी होती. शहरातील प्रमुख व लक्षवेधी देखावे असणारे बहुतांश मंडळे याच मार्गावर आहेत. रविवारी सायंकाळपासूनच कुटुंबासह देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी सायंकाळी शहराच्या काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली होती. पाऊस असला तरी देखावे पाहण्यासाठीचा नागरिकांचा उत्साह कमी झाला नव्हता. कॉलेज कॉर्नर ते पटेल चौक या परिसराबरोबरच रिसाला रोड, बसस्थानक परिसर, गावभाग, मार्केट यार्ड परिसरातील मंडळांचे देखावे पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. सोमवारी पाचव्यादिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन असल्याने त्यानंतर आणखी गर्दी वाढणार आहे. जिल्ह्यातील ३५२ गणेश मंडळांच्या मूर्तींचेही आज विसर्जन होणार आहे.स्टॉल्स्मुळे सोय : खवय्यांची गर्दीदेखावे पाहण्याच्या निमित्ताने होत असलेल्या गर्दीमुळे ठिकठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते. रात्री उशिरापर्यंत त्यावर नागरिकांची गर्दी होती. महापालिका प्रशासनाने विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेतच गाडे लावण्यात आले होते. तरीही वाहनांमुळे प्रमुख मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.चोख पोलीस बंदोबस्तरात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मंडळाच्या मंडपाबाहेर व रस्त्यावरही ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी हजर होते. ज्याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती, त्याठिकाणीही सत्वर पोलीस पोहोचून मार्ग मोकळा करून देत होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही स्वयंसेवकाची भूमिका बजावत गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन केले होते.
देखावे पाहण्यासाठी सांगलीतील रस्ते गर्दीने फुलले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:08 PM