भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) गावातील सरळी पुलावरील रस्त्यावर मुरूम पसरल्याने तो पूर्णपणे धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना अपघाताच्या घटना घडत असून प्रशासन व संबंधित ठेकेदाराने तत्काळ डांबरीकरण करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व भिलवडीचे नेते संग्राम पाटील यांनी केली आहे.
कृष्णेला येणाऱ्या महापुरातून गावाबाहेर पडण्यासाठी सुरक्षित पूल असावा म्हणून गावच्या पूर्व दिशेला सरळी ओढ्यावर जुन्या पुलाला पर्यायी पूल बांधण्यात आला. कोट्यवधीची तरतूद करूनही हा पूल कित्येक वर्षे अपूर्ण स्थितीत होता. गतवर्षी दोन्ही बाजूस मुरुमाचा भराव टाकून पूल वाहतुकीस सुरू करण्यात आला. पण त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही. पुलावरून खाली पाणी वाहून जाण्याची कोणतीच सुविधा नसल्याने पावसाळ्यात तर या पुलावरच पाणी साठून राहते.
मुरुमाचे दगड विखुरलेले आहेत. वाहनांच्या वर्दळीमुळे धुरळा उडत आहे. धुळीमुळे समोरचे वाहन न दिसल्याने या मार्गावर छोटेमोठे अपघात नित्याचेच आहेत. पुलाच्या बाजूच्या मौलानानगर, वसंतदादानगर या वस्तीमधील नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता तत्काळ डांबरीकरण किंवा काँक्रिटचा करावा अशी मागणी जोर धरत आहे.
फोटो - भिलवडी (ता. पलूस) येथील सरळी पुलावरील मुरूम पसरल्याने धोकादायक बनलेला रस्ता.