कोकरूड : राहायला घर नाही. कसायला जमीन नाही. रोजगार करायचा तर मिळत नाही. कुणाकडे काम करायचे तर त्यात भागत नाही आणि व्यवसाय करायचा तर सरकार करू देत नाही. वडील घरात अर्धांगवायूने अंथरुणावर पडून. आईचा सगळा वेळ त्यांची सेवा करण्यात जातो. आर्थिक टंचाईमुळे कुटुंबाचे हाल होत आहेत. ही कहाणी आहे खुजगाव (ता. शिराळा) येथील सलून व्यावसायिक हरीश कृष्णा कदम या तरुणाची.
बऱ्याच वर्षांपूर्वी हरीशचे आजोबा शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली येथून रोजगारासाठी खुजगाव येथे आले. त्यांनी गावात केस कर्तनालयाची गावकी सुरू केली. गावाने त्यांना एक गुंठा जमीन चांदोली-कोकरूड रस्त्यालगत देऊ केली होती. तिथे त्यांनी दगड-मातीचे घर बांधले होते. आजोबांच्या निधनानंतर मुलगा कृष्णा यांनी काही वर्षे हा व्यवसाय सुरू ठेवला. मात्र, गावकी कुणालाच परवडत नसल्याने त्यांनी रोखीने व्यवसाय सुरू केला होता. त्यातून मिळालेल्या बचतीतून त्यांनी पाच वर्षांपूर्वी घराची दुरुस्ती केली होती. मात्र, एक महिन्यापूर्वी पाचवड-कोकरूड राज्य मार्गाच्या रुंदीकरणात त्याचे अर्धे घर पाडले. यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे.
सध्या राहायला घर नाही. दुसरे बांधायला जागा नाही. कसायला जमीन नाही. रोजगार मिळत नाही. एखाद्या ठिकाणी नोकरी मिळाली तर तीन हजार रुपयांमध्ये कुटुंब चालवाचे कसे, हा प्रश्न आहे.
कुटुंबाला जगविण्यासाठी बाहेरून शिक्षण घेत केस कर्तनालयाचा व्यवसाय सुरू केला. मात्र, गेल्या वर्षभरापासून तो अडचणीत आला आहे. त्यातच पुन्हा व्यवसाय कसाबसा सुरू झाला. मात्र, कोरोनामुळे त्यालाही ब्रेक लागला आहे. सध्या आम्ही कसे जगायचे, हेच कळेनासे झाले असल्याचे हरीश कदम सांगतो.
हरीश कदमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे. त्याला मिळणाऱ्या रकमेतून वडिलांची औषधे, घरखर्च कसाबसा करीत असताना रस्ता रुंदीकरणात त्याचे राहते घरच गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. ठेकेदार आणि प्रशासनाने त्यांची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- किरण सावंत विस्तारक युवासेना महाराष्ट्र राज्य.