शिराळा
: विटा - अनुष्करा (मलकापूर, जि. काेल्हापूर) या रस्ता रुंदीकरणाचे काम भर पावसात शिराळा -कापरी फाटा येथे सुरू होते. निकृष्ट काम होत असल्यामुळे डांबरीकरणाचे काम प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष श्रीराम नांगरे व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा बंद पडले, तसेच ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
गुरुवारी मोठा पाऊस सुरू होता तरीही कापरी फाटा येथे शिराळा बाह्य वळण रस्त्याचे संबंधित कामाच्या ठेकेदाराने डांबरीकरणाचे काम सुरूच ठेवले होते. यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष नांगरे, संजय कुरणे, दिग्विजय शिंदे, ऋषिकेश गायकवाड, दिग्विजय खबाले, धैर्यशील खबाले, भालचंद्र बिळासकर, सत्यजित शिंदे, ऋषिकेश घोडे, राहुल पवार यांनी संबंधित ठेकेदारास पाऊस पडत आहे, त्यामुळे हे काम बंद करा, असे सांगितले. यावरून यांच्यात किरकोळ वादावादी झाली. मात्र, अखेर हे काम बंद पाडले. यावेळी वरिष्ठ अधिकारी सुभाष पाटील यांना फोन करून हे काम बंद करण्यात यावे, असे सांगितले.
यावेळी त्यांनी विटा-रत्नागिरी असे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यातील विटा, पेठ, मलकापूर, अनुस्करा अशा जवळपास १५० किमीच्या रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराकडे आहे. हे हायब्रीड अँयुटीअंतर्गत १९०.३७ कोटी रुपयांचे काम सुरू आहे. पन्हाळा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सर्व काम सुरू आहे. पन्हाळ्याहून विटा ते अनुस्करापर्यंत येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लक्ष देणे कितपत शक्य आहे, हा संशोधनाचा विषय आहे. याचबरोबर या ठेकेदाराने ठरावीक अंतराचे काम पूर्ण करून पुढील कामास सुरुवात केली आहे. संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार होत आहे.
या रस्त्याच्या कामातील एक भाग दुतर्फा असणाऱ्या झाडांची कत्तल झाली आहे.