सांगली : महापालिका क्षेत्रासह कृष्णा व वारणा नदीकाठच्या भागातील महापूर व अतिवृष्टीमुळे वारंवार खराब होणारे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पूरबाधित रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली आदी उपस्थित होते.बैठकीत आमदार गाडगीळ यांनी महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त भागातील रस्ते काँक्रिटीकरणाचा मुद्दा मांडला. पूर तसेच अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागातील रस्ते खराब होतात. दरवर्षी रस्ते करण्यावर मोठा खर्च होतो. हेच रस्ते सिमेंट काँक्रीटचे करावेत. त्यामुळे दरवर्षी रस्त्यांवर होणारा खर्चही वाचेल अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनीही सर्व पूरबाधित रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.शहरासह पूरग्रस्त गावांनाही फायदामहापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याबाबत प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका प्रशासनालाही १५ दिवसांपूर्वीच आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे केवळ महापालिका क्षेत्र नव्हे, तर कृष्णा, वारणा नदीकाठच्या पूरग्रस्त गावातील फायदा होणार आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.
Sangli News: कृष्णा-वारणाकाठच्या पूरग्रस्त भागातील रस्ते काँक्रीटचे होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 5:28 PM