लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेस जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मिळाला आहे; परंतु सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीच्या श्रेयवादात गटारी, रस्ते होत नाहीत. यासाठी बांधकाम विभागाकडे १० कोटी रुपयांचा निधी आहे. मात्र, अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर सत्ताधारी विकास आघाडीने केलेल्या घोषणांची पूर्तता झालेली नाही. भुयारी गटारीच्या योजनेला मंजुरी आणली. त्याचे कामही अर्ध्यावर थांबले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याच्या तक्रारी नागरिकांनी जयंत पाटील यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ते आणि गटारीसाठी १० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. हा निधी बांधकाम विभागाकडून खर्ची केला जाणार आहे. मात्र सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादी यांच्या श्रेयवादात या कामाला मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे.
शहरातील भुयारी गटारीचे ३४ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. तेथील रस्त्यांची कामे तातडीने व्हावीत यासाठीच जयंत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात १० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुसऱ्या टप्प्यात १५ कोटीसाठी प्रयत्न केले आहेत; परंतु पालिकेने या कामांचा ठराव करणे क्रमप्राप्त आहे. नगरपालिकेत ठराव करण्याविषयी विशेष सभा घेण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे रीतसर विनंती अर्ज केला आहे. तथापि विकास आघाडीतील काही नेते निधी अद्याप आलाच नाही, असे सांगत आहेत.
कोट
शहरातील रस्ते व गटारीसाठी १० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी पाच कोटीच्या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली आहे आणि पाच कोटी रकमेची निविदाही काढण्यात आली आहे. जेथे भुयारी गटारीचे काम पूर्ण झाले नाही, तेथील रस्ते करू नयेत, अशा आशयाचे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम विभागास दिले आहे.
-सुभाष पाटील, उपअभियंता बांधकाम विभाग, इस्लामपूर