मिरज : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी (ता. मिरज) येथे सह्याद्री पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी जीपमध्ये झोपलेल्या कुटुंबाला आठ दरोडेखोरांच्या टोळीने चाकू हल्ला व मारहाण करून महिलांच्या गळ्यातील सोने व रोख रक्कम, असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटला. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी मालगाव येथे पारधी वस्तीवर छापा टाकून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.दरोडेखोरांनी तीन तोळे दागिने आणि पंधरा हजारांची रोख रक्कम, असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटला. याबाबत चंद्रकांत विठ्ठलराव बावीकाडी (वय ४२, रा. हनुमाननगर, मेडचल, जि. मेडचल, तेलंगणा) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. चंद्रकांत बावीकाडी आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शन करून सोलापूर येथून कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी भाड्याच्या जीपमधून जात होते.गुरुवारी मध्यरात्री एक वाजता जीप चालकाला झोप आल्याने रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी येथे असलेल्या सह्याद्री पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी जीप थांबविली. जीपमध्ये चालक, चंद्रकांत बावीकाडी दाम्पत्य, नातेवाईक महिला व चार लहान मुले, असे सर्वजण झोपी गेले. रात्री दीड वाजता सुमारे आठ दरोडेखोर जीपजवळ आले. जीपचे दरवाजे उघडण्यास भाग पाडत चाकूचा धाक दाखवून चंद्रकांत बावीकाडी यांना बाहेर खेचून मारहाण केली. दोन महिलांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे गंठण, मंगळसूत्र व रोख रक्कम १५ हजार, असा दोन लाखांचा ऐवज हिसकावला. दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने चंद्रकांत बावीकाडी व त्यांच्या पत्नीच्या हातावर दरोडेखोरांनी चाकूने वार केल्याने हे दाम्पत्य जखमी झाले.दरम्यान दरोड्याच्या घटनेचे पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दरोडेखोरांच्या शोधासाठी मालगाव, बेडग परिसरात पारधी वस्त्यांवर छापे टाकले. दोघा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. कळंबी येथील या पेट्रोल पंपावर यापूर्वीही रात्रीच्या वेळी वाहनधारकांना लुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
सायरन वाजला अन् दरोडेखोर पळालेरात्री दरोड्याचा प्रकार सुरू असताना पेट्रोल पंप कर्मचारी अभिषेक खाडे याने पोलिसांना फोन केला व पंपावरील सायरन वाजविला. सायरन वाजल्याने दरोडेखोर दचकले. मात्र, केवळ पाचच मिनिटांत लूटमार करून चोरटे अंधारात पसार झाले. या प्रकाराने भयभीत झालेल्या बावीकाडी यांनी अंकली फाट्यावर धाव घेऊन तेथील रस्त्यावर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना घेऊन परत आले.