सांगली : कवठेपिरान (ता.मिरज) येथे शुक्रवारी मध्यरात्री एकाच्या घरात घुसून दोन लाख रुपयांची रोकड तसेच १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. तीन ते चारजणांनी कुटूंबियांना धमकावत ऐवजावर डल्ला मारला. घटनास्थळी सांगली ग्रामीण पोलिसांसह एलसीबी तसेच वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगली-कवठेपिरान रस्त्यावर रफीक दस्तगीर मगदूम यांचे घर आहे. त्यांची मुलगी तरन्नूम शिफा मुजावर या एका नातेवाईकांच्या लग्नासाठी माहेरी आल्या आहेत. मगदूम यांच्या घराच्या बांधकामाच्या कामासाठी बॅंकेतून रोकड काढून आणली होती. बांधकाम सुरू असल्याने शेजारीच ते राहत होते. लग्नासाठी म्हणून तरन्नूम यांनीही आपले सोन्याचे सर्व दागिने आणले होते.
शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोघेजण त्यांच्या घरात घुसत त्यांनी दगडाचा धाक दाखवत सर्वाना गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर घरातील दोन लाखांची रोकड आणि तरन्नूमचे १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले. आतमध्ये दोघे ऐवज घेत असताना, लक्ष ठेवण्यासाठी दोघे बाहेरच थांबले होते.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपअधीक्षक प्रणील गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नाकाबंदी करण्यात आली होती मात्र, चोरटे हाती लागले नाहीत. पोलिसांनी श्वानपथक मागवून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. पण काही ठोस पुरावे मिळाले नाहीत. जवळच चोरट्यांनी एका शेतात साहित्य टाकून दिल्याचेही समोर आले आहे.