इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथे भंगार देण्याचा बहाणा करत कोल्हापूरच्या भंगार व्यापाऱ्याकडील १४ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा छडा लावत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. पाच लूटमारांच्या अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या.
या टोळीने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. ऋषिकेश विष्णू क्षीरसागर (वय १९), उमेश उत्तम कांबळे (२०), नीलेश राजू बामणे (२०, तिघे रा. ताकारी), ओंकार हणमंत बोडरे (१९) आणि संदीप वीरसिंग जाधव (दोघे रा. तुपारी, पलूस) अशी या पाचजणांची नावे आहेत. याबाबत उमर अफझल मलिक (२४, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. मूळ रा. खालेपार्क, मुझ्झफरनगर, उत्तरप्रदेश) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.
मलिक याला या पाच संशयितांनी भंगार देतो, असे सांगत ताकारी रेल्वे स्थानकाच्या परिसरात गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास बोलावले होते. मलिक हा तेथे गेल्यानंतर चाैघांनी त्याला चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या खिशातील १४ हजार रुपयांची रोकड काढून पोबारा केला. मलिक याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, निरीक्षक नारायण देशमुख यांनी गुन्हे शाखेला तपासाची सूचना केली.
हवालदार अरुण पाटील यांना ताकारी परिसरात चार संशयितपणे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने चौघांना ताब्यात घेतले. या चौघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ५ जानेवारीला आणखी एका भंगार विक्रेत्याला २५ हजार रुपयांना लुबाडल्याचे कबूल केले.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपनिरीक्षक समाधान लवटे, हवालदार दीपक ठोंबरे, अरुण पाटील, अमोल चव्हाण, शरद जाधव, आलमगीर लतीफ, कौस्तुभ पाटील, योगेश जाधव आणि सायबर शाखेचे कॅप्टन गुंडेवाड यांनी भाग घेतला.
फोटो-२२इस्लामपुर२
फोटो ओळ : ताकारी परिसरात लूटमार करणाऱ्या टोळक्यासमवेत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पोलीस कर्मचारी.