इस्लामपूर : येथील औद्योगिक वसाहत परिसरात दहशत असलेल्या प्रकाश पुजारी गँगने हॉटेलमध्ये मद्यपान करत धिंगाणा घातला. त्यानंतर चालकास शिवीगाळ करून तलवारीचा धाक दाखवत काऊंटरमधील २४०० रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटली. महिन्याला दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
याबाबत अमोल दिनकर पाटील (३३, रा. साखराळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश पुजारी, विकास पवार आणि बिरू मोटे अशा तिघांविरुध्द लूटमार आणि मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमोल पाटील यांचे हॉटेल आणि बिअरबार आहे. त्याठिकाणी पुजारी साथीदारासोबत मद्यपान करत होता. त्यांच्या दंग्यामुळे इतर ग्राहकांना त्रास होत होता. अमोल पाटील यांनी दंगा करू नका, असे सांगितल्याचा राग आल्यावर पुजारी याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हॉटेलमधील कामगारांनी त्याला ढकलून बाहेर काढले.
त्यानंतर पुजारीने त्याच्या दुचाकीला लावलेली तलवार काढत पाटील यांच्या अंगावर धावून आला. त्यांना ढकलून देत काऊंटरमधील २ हजार ४०० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. तसेच महिन्याला दोन हजार रुपये खंडणी द्यायची, असे धमकावले. पोलिसात तक्रार केल्यास तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी त्याने तिथे असलेल्या अन्य नागरिकांनाही तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवली.