सांगली : महापालिकेच्या विद्युत विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. वीज बिल घोटाळ्यानंतर आता कुपवाड ते सुतगिरणी रस्त्याच्या पोल शिफ्टिंगच्या कामातही घोळ घातला आहे. या विभागाकडून नागरिकांच्या कररुपी पैशावर दरोडा टाकला जात असून आयुक्त नितीन कापडणीस यांनी या विभागाची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली.
साखळकर म्हणाले की, महापालिकेचा विद्युत विभाग चराऊ कुरण बनले आहे. नुकतेच या विभागात एक कोटी २९ लाख रुपयांचा वीज बिल घोटाळा उघडकीस आला. या वीज बिल घोटाळ्याची सखोल चौकशी झाल्यास तो किमान दहा ते पंधरा कोटीपर्यंत जाईल. विद्युत विभागाचे कर्मचारी सहभागी असल्याशिवाय हा घोटाळा शक्य नाही. त्यात भरीस भर म्हणून कुपवाड ते सुतगिरणी रस्त्यावरील पोल शिफ्टिंग कामातही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
या कामासाठी विद्युत विभागाने ८० लाखाचे अंदाजपत्रक तयार केले तर महावितरणने हेच काम ४५ लाखात करण्याचा अहवाल दिला आहे. जवळपास ३५ लाख रुपयांची तफावत आहे. ही तफावत कशी आली, याचे स्पष्टीकरण होण्याची गरज आहे. या विभागाकडून नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकला जात आहे. त्यामुळे विद्युत विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, महापालिका स्थापनेपासून या विभागाचे विशेष लेखापरीक्षण करावे, अशी मागणीही साखळकर यांनी केली. किरकोळ विषयावर तुटून पडणाऱ्या महापालिकेतील ७८ नगरसेवकांनी या विषयावर मौन पाळले आहे. ते तोंडातून शब्द काढायला तयार नाही, यामागे काय गौडबंगाल आहे? असा सवालही त्यांनी केला.