सांगली : टेंभूच्या पाण्यासाठी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या रोहित पाटील यांच्या प्रकृती दुपारनंतर ढासळली. शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणीनंतर औषधोपचार केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आंदोलनात सहभाग कायम ठेवला आहे.तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आठ गावांचा समावेश टेंभू विस्तारित योजनेत करावा यासाठी आमदार सुमनताई पाटील व त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी सोमवारपासून उपोषण सुरु केले आहे. रोहित पाटील यांची प्रकृती रविवारपासूनच चांगली नव्हती, तरीही त्यांनी सोमवारी सकाळी उपोषण सुरु केले. सकाळपासून हजारो समर्थक कार्यकर्ते, मतदारसंघातील लोकांच्या गर्दीत ते आंदोलनाचे नेतृत्व करत होते. जिल्हाभरातून आलेल्या लोकप्रतिनिधी व लोकांशी संवाद साधत होते. विश्रांती नसल्याने दुपारनंतर त्यांची प्रकृती बिघडली. ताप वाढला. घसादुखी सुरु झाली. भाषणादरम्यान आवाज स्पष्ट येईना झाला. काहीशा अशक्तपणामुळे त्यांनी उपोषण मंडपातच विश्रांती घेतली.शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती तपासून औषधे दिली. डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यासोबत बहिणी स्मिता यादेखील आहेत. प्रकृती बिघडली, तरी आंदोलनातून माघार घेणार नाही असे रोहित पाटील यांनी सांगितले.
सांगलीत उपोषणादरम्यान रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली
By संतोष भिसे | Published: October 02, 2023 5:53 PM