सांगली : चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे काही अडचण नाही, असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाला रविवारी दुजोरा दिला.
सांगलीत स्थानिक कार्यक्रमानिमित्त आलेल्या पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर हा खुलासा केला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटील यांच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत एक ट्वीट केले होते. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम आमच्या पक्षात नेहमी होते. त्यामुळे काही अडचण नाही. शेवटी पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने नेतृत्व केलं पाहिजे, हा विचार आमच्या पक्षात मुळापासूनच आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याला जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला.
गोव्यातही आघाडी एकत्र असती तर आनंद वाटला असता..
दरम्यान, गोव्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्रित असती तर अधिक आनंद झाला असता. पण शिवसेना-राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्रित आहे. त्यांना मोठे यश मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा उद्धव ठाकरेंनी पूर्ण करून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, अशा शब्दात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.