श्रीनिवास नागेसांगली : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी सोमवारी कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरून पक्षबांधणीसाठी पुन्हा दंड थोपटले. सख्ख्या पुतण्यासह विश्वासू सहकाऱ्यांनी दगा दिला असताना चर्चेतील तिघा तरुण चेहऱ्यांनी मात्र ‘शरद पवार’ या आश्वासक चेहऱ्यालाच पसंती दिली आहे. पवारांचे नातू आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक आणि दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची कऱ्हाडमधील उपस्थिती चर्चेची ठरली.रविवारी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी सकाळी कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन नव्या संघर्षाची नांदी केली. वयाच्या ८३ व्या वर्षीही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत पक्ष उभारण्याची उमेद त्यांच्या देहबोलीतून दिसत होती. यावेळी राज्यभरातून पवारप्रेमी उपस्थित होते. त्यात आ. रोहित पवार, प्रतीक पाटील, रोहित पाटील या तिघा तरुण नेत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. तेथील सभेला हजेरी लावून तिघांनी प्रसारमाध्यमांसमोर पवारांचे समर्थन करत त्यांची साथ सोडणार नसल्याचे निक्षून सांगितले. त्यानंतर तिघेही एकाच मोटारीतून रवाना झाले.रोहित पवार कर्जत-जामखेडचे आमदार असून, त्यांनी २०१९ मध्ये भाजपचे मंत्री राम शिंदे यांना अस्मान दाखवले होते. बारामती ॲग्रो कंपनीची धुरा ते सांभाळतात. जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या रोहित यांनी चुलते अजित पवार यांच्याकडे न जाता आजोबा शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते कऱ्हाडमध्ये पवारांच्या मोटारीतूनच आले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवस मुंबईत तळ ठोकून आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकांत आणि या पेचप्रसंगात कायदेशीर लढाई करण्याच्या तयारीत ते व्यस्त आहेत. त्यामुळे ते कऱ्हाडमध्ये आले नव्हते, मात्र त्यांचे पुत्र प्रतीक कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. या उंचापुऱ्या तरुण नेत्याने लक्ष वेधून घेतले होते. नुकतीच राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या प्रतीक यांच्याकडे राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदही आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत मतदारसंघ सांभाळणाऱ्या प्रतीक यांनी सोमवारी कऱ्हाडात वडिलांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही.राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी महाराष्ट्र पालथा घालणारे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या आठवणीही अनेकांना दाटून आल्या. कारण त्यांची अढळ पवारनिष्ठा सर्वश्रुत आहे. त्यांची उणीव त्यांचे पुत्र रोहित यांनी भरून काढली. शरद पवार यांचे समर्थन करत राज्याला त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे रोहित यांनी संयमी शैलीत जनसमुदायाला निक्षून सांगितले.
काय म्हणतात प्रतीक पाटील...दुपारी प्रतीक पाटील यांनी फेसबुक पेजवर केलेली पोस्ट : महाराष्ट्राच्या समतोल विकासाचे ध्येय बाळगून प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रीतिसंगम या स्मृतिस्थळाला आदरणीय शरद पवार साहेब यांनी भेट देऊन झंझावती दौऱ्याची घोषणा केली. पवार साहेब, आपला हा सळसळता उत्साह आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा आहे. आज आपल्या प्रेमापोटी समर्थन देण्यासाठी आलेल्या अलोट जनसागराचा एक छोटासा भाग झाल्याचे समाधान मला आहे.