सांगली : राज्याचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे तासगाव विधानसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढवतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात पाटील बोलत होते.
राजकारणात थोडसे थांबावे लागते. एवढी विधानसभा सुमनतार्इंना लढावी लागेल. त्यांना राज्यात उच्चांकी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन केले. यानंतर पाटील यांनी आबांच्यासारखी रोहितची वक्तृत्वशैली आहे. त्यामुळे पुढची विधानसभा रोहितला मिळणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे 16 फेब्रुवारी 2015 ला निधन झाले. पाटील कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात काही आठवडे उपचार सुरू होते. अनेकांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या डान्स बारवर बंदीची कारवाई करणा-या पाटील यांची गृहमंत्रीपदाची कारकिर्द चांगलीच गाजली. सांगलीजवळच्या तासगावातून अत्यंत तळातून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या पाटील यांची प्रतिमा ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा अशी होती. तब्बल पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या पाटील यांनी सर्वात जास्त काळ गृहमंत्रीपदही भूषवले होते.
त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. त्या मोठ्या मताधिक्याने तासगाव मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या.