लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रभावीपणे विकास कामे करून विकास कामांचा हा मिरज पॅटर्न जिल्ह्यात राबविणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी सांगितले. रोहयोअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांची माहिती मिळावी व कामांच्या पूर्णत्वासाठी सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांची एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंचायत समित्यांना वाढीव निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन खा. पाटील यांनी पंचायत समिती सदस्यांना दिले. शेतकऱ्यांना शेततळ्यांचे अनुदान मिळण्यात येत असलेल्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी मिरज पंचायत समितीत खा. संजय पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जि. प.चे बांधकाम व अर्थचे सभापती अरुण राजमाने, पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे व जिल्हा कृषी अधिकारी आर. डी. साबळे, तालुका कृषी अधिकारी एस. एस. मेडीदार उपस्थित होते. खा. पाटील यांनी जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन अनुदान मिळण्याबाबत तोडगा काढून समस्या सोडवून अधिकाधिक शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. बैठकीत रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे राबविण्यात येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. रोहयो योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांची माहिती ग्रामीण भागातील जनतेला नसल्याने तालुक्यात रोहयोची कामे प्रभावीपणे राबविली जात नसल्याची तक्रार सलगरेचे उपसरपंच तानाजी पाटील, माालगाव ग्रामपंचायतीचे गटनेते प्रदीप सावंत यांच्यासह ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याची दखल घेऊन खा. पाटील म्हणाले, रोहयोअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विकास कामांच्या माहितीसाठी व प्रभावी अंमलबजावणीसाठी सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांची मिरज पंचायत समितीत एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात येईल. योजनेअंतर्गत गाव विकासाच्या प्रमुख सहा कामांवर भर देऊन ती कामे पूर्ण केली जातील. तालुक्याच्या विकास कामांचा हा पॅटर्न जिल्हाभर राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळा घेण्याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांना सूचना केली. मिरज बाजार समितीचे सभापती वसंत गायकवाड, साहेबराव जगताप, बाळासाहेब भंडारे, आनंदा गडदे, विश्वास खांडेकर, आप्पासाहेब पाटील उपस्थित होते. निधीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार १४ वा वित्त आयोग थेट ग्रामपंचायतींना वर्ग झाल्याने पंचायत समितीकडे तुटपुंजा सेस निधीशिवाय दुसरा निधी नसल्याने मतदार संघात विकास कामे राबविण्यात पदाधिकाऱ्यांना अडचणीत येत असल्याने वाढीव निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उपसभापती काकासाहेब धामणे, रंगराव जाधव, विक्रम पाटील, राहुल सकळे या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह एस. आर. पाटील यांनी खा. पाटील यांच्याकडे केली. खा. पाटील यांनी या मागणीची दखल घेऊन पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
‘रोहयो’चा मिरज पॅटर्न जिल्हाभर राबविणार
By admin | Published: June 10, 2017 12:28 AM