अशोक पाटील /लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही गटांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. काही कार्यकर्त्यांनी संघटनेचे आदेश नसतानासुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मात्र निवडणुकीबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर होताच संघटनेचा आदेश नसताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश देसाई यांनी वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते रविकिरण माने, भास्करराव मोरे, भागवत जाधव यांच्यासोबत सहकार पॅनलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. काही कार्यकर्ते डॉ. इंद्रजित मोहिते, तर काही अविनाश मोहिते यांच्या संपर्कात आहेत.
सध्या राजू शेट्टी यांनी महाआघाडी आणि साखर कारखानदारांविरोधात आवाज उठवला आहे. त्यातच विधान परिषदेवर जाण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ‘कृष्णा’बाबत शेट्टी यांनी सावध भूमिका घेतली आहे.
वाळवा तालुक्यात नेर्ले, तांबवे, रेठरे हरणाक्ष, बोरगाव, येडेमच्छिंद्र परिसरातून आठ जागा आहेत. या गावांतून सभासदांची संख्या मोठी आहे. या पट्ट्यात ऊसदर मिळण्यात तिन्ही शेतकरी संघटनांचे योगदान असले तरी राजू शेट्टी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.
कोट
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीबाबत वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांनी एक विचार घेऊन निवडणुकीत सक्रिय व्हावे.
- राजू शेट्टी,
स्वाभिमानी शेतकरी संघटना