इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर केल्याने अंतर्गत वाद उफाळला आहे. शेट्टी यांनी मात्र संघटनेची भूमिका तटस्थ असल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडणूक जाहीर होताच वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. यातूनच संघटनेत धुसफूस सुरू झाली. काहींनी संस्थापक व रयत पॅनलला पाठिंबा दिला. यामुळे संघटनेच्या पाठीशी असलेल्या ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संघटनेचे कार्यकर्ते तिन्ही गटात आहेत. तेच पॅनल प्रमुखांची राजू शेट्टींशी भेट घडवून आणण्याचे राजकारण करून पत्रकबाजी करत आहेत. त्यातून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यात एकूण सभासदांपैकी ७ ते ८ टक्के सभासद संघटनेला मानतात, असा दावा संघटनेचा आहे. शेट्टी यांनी भूमिका मांडताना समतोलपणा राखला आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या आहेत.
संघटनेचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांनी सभासदांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ज्यांचा एक टनभरही ऊस कारखान्याला जात नाही, त्यांना या निवडणुकीवर भूमिका मांडण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. माने यांनी म्हटले आहे की, संस्थापक पॅनलला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, ते कारखान्याचे सभासदसुद्धा नाहीत. दुसरीकडे संस्थापक पॅनलची सत्ता असताना काहींनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्याचा मुद्दाही पुढे आणला जात आहे.
कोट
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ‘कृष्णे’च्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतली आहे. अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. शेतकऱ्यांना न्याय देणे हे संघटनेचे मूळ धोरण आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर कोणालाही पाठिंबा द्यावा. संघटनेची भूमिका स्पष्ट करण्याचे अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाहीत.
- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना