दत्ता पाटील ल्ल तासगावसुकामेवा म्हणून महागड्या खाद्यपदार्थांच्या वस्तूत बेदाण्याची गणना होते. पण कवडीमोल दरामुळे त्याची अवस्था पालापाचोळ्यासारखी झाली आहे. निरंकुश विक्री व्यवस्था, उत्पादनाचा वाढत जाणारा खर्च यामुळे बेदाण्याचा उत्पादन खर्चाशी ताळमेळ जुळेनासा झाला आहे. ढासळलेल्या दरामुळे बेदाणा उत्पादकांचे चाक नुकसानीच्या गाळात रूतले आहे.बेदाणा उत्पादनाचे आगर म्हणून तासगावच्या बाजारपेठेची ओळख आहे. तासगाव बाजार समितीतील बेदाणा सौदे राज्यभरात प्रसिध्द आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुकामेवा असणाऱ्या बेदाण्याची वाताहत झाली आहे. महागड्या सुकामेव्याच्या यादीत बेदाण्याचे नाव असले तरी, या बेदाण्याची बरोबरी हंगामी दोन-तीन महिन्यात बाजारात येणारा भाजीपालाही करू लागला असल्याचे चित्र आहे.बेदाणा निर्मितीसाठी एप्रिल महिन्यात होणाऱ्या खरड छाटणीपासून खर्चाला सुरुवात होते. आॅक्टोबर महिन्याच्या आसपास पीक छाटणी झाल्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर द्राक्षकाढणी होते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन महिन्याभराच्या कालावधीनंतर तयार केलेला बेदाणा बाजारात विक्रीसाठी येतो. म्हणजे बेदाणा उत्पादन करण्यासाठी वर्षभर सातत्याने कष्ट आणि खर्च करावा लागतो. एकरी तीन हजार पेटी (चार किलो द्राक्षांची एक पेटी) सरासरी द्राक्षांचे उत्पादन निघते. त्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. (हवामान चांगले असल्यास, अन्यथा याहीपेक्षा जास्त खर्च येतो.) बेदाणा निर्मितीसाठीची चार किलोच्या एक पेटी द्राक्षांसाठी सुमारे ६० ते ७० रुपये खर्च आहे. त्यानंतर द्राक्षांवर प्रक्रिया करुन बेदाणा निर्मितीसाठी पुन्हा चार किलो द्राक्षांना २५ ते ३० रुपये खर्च येतो. चांगल्या दर्जाची द्राक्षे असतील तर चार किलो द्राक्षांपासून एक किलो बेदाणा तयार होतो. द्राक्षे आणि बेदाणा निर्मितीचा एकूण सरासरी खर्च शंभर रुपयांच्या घरात आहे. हे करत असतानाच अवकाळी पाऊस, बेभरवशाचे हवामान अशा संकटांमुळे नुकसानही सहन करावे लागते. हिरव्या बेदाण्यास शंभर रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत, तर पिवळ्या बेदाण्यास ९० रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत दर आहे. सरासरी दर शंभर ते सव्वाशे रुपयांच्या दरम्यानच आहे. बेदाणा बाजार समितीत आणण्यापर्यंतची भूमिका बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात आहे. मात्र नेमका दर ठरविण्याचे अधिकार शेतकरी, बाजार समितीची यंत्रणा किंवा शासनाच्या हातात नाहीत. बेदाण्याचे दर ठरविण्याचे अधिकार परराज्यातून खरेदीसाठी येणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांच्या हातातच आहेत. त्यामुळे व्यापारी स्वत:च्या सोयीनुसार बेदाण्याचे दर ठरवतात. अनेकदा दर कोसळल्यानंतर, बेदाणा खरेदी करुन व्यापाऱ्यांकडूनच त्याची साठेबाजी केली जाते. त्यामुळे जादा दराचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. भाजीपाल्याच्या दराएवढाच दर बेदाण्याला मिळत आहे. बेदाणा निर्मितीचा प्रवास... बेदाणा निर्मितीसाठी तयार झालेल्या द्राक्षांवर प्रक्रिया करुन ती बेदाणा रॅकवर आठ ते पंधरा दिवस पसरली जातात. त्यानंतर पुन्हा प्रक्रिया करून, निवडून प्रतवारीनुसार बॉक्समध्ये पॅकिंंग करून हा बेदाणा मार्केटमध्ये नेला जातो. सरासरी चार किलो द्राक्षांपासून एक किलो बेदाणा तयार होतो. मात्र वातावरणात बदल झाल्यास, चांगल्या दर्जाचा बेदाणा तयार होत नाही. अशावेळी दुय्यम दर्जाच्या बेदाण्यास ३० ते ४० रुपये किलोला दर मिळतो.उधार विक्री होणारा एकमेव माल बहुतांश शेतीमालासह सर्वच ठिकाणी रोख विक्रीचे व्यवहार होत असतात. बेदाण्याची मात्र शेतकऱ्यांना उधार विक्री करावी लागते. शेतकऱ्यांना एक ते दोन महिन्यांनी पैसे दिले जातात. तात्काळ पैसे हवे असतील, तर झालेल्या किमतीतून दोन टक्के रक्कम कपात केली जाते. ऐन मार्चएन्डच्या काळातच बेदाणा बाजारात येतो. यावेळी बँकेच्या कर्जाच्या फिरवाफिरवीसाठी पैशाची आवश्यकता असल्याने, तातडीच्या पैशासाठी दोन टक्के कमी घेतले जातात. आर्थिक अडचण असल्यास अनेक शेतकरी परस्पर स्टोअरेजवरच कवडीमोल दराने बेदाण्याची विक्री करतात.
ढासळलेल्या दरात रूतले बेदाणा उत्पादकांचे चाक
By admin | Published: April 12, 2017 11:39 PM