कडेगाव : कायम दुष्काळी भागातील शेतीसाठी सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे आवर्तन शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे योग्यवेळी मिळाले पाहिजे. योजनांच्या पाणीपट्टी वसुलीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू. वीजबिल थकबाकी काळातही वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. योजनांच्या वाट्याचे पाणी नियमित आवर्तने देऊन उचलले पाहिजे. तशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.नाबार्ड योजनेतून शेळकबाव (ता. कडेगाव) येथे शेळकबाव ते ढवळेश्वर रस्ता रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण या ६० लाखांच्या निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. पतंगराव कदम बोलत होते.डॉ. कदम म्हणाले की, शेळकबाव येथे १ कोटी ४० लाख रुपयांची विकासकामे झाली आहेत. मी मंत्री असताना गावोगावी भरघोस निधी दिला. कार्यकर्त्यांनी गटबाजी न करता एकसंध राहिले पाहिजे. शेळकबाव येथे येरळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढणार. एसटी पिकअप् शेड बांधण्यासाठी निधी देणार आहे. स्ट्रिटलाईट व ट्रान्स्फॉर्मरची कामे मार्गी लावणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, सभापती लता महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, सरपंच आक्काताई कदम, सहायक अभियंता सुभाष पाटील, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे, शंकरराव कदम आदी यावेळी उपस्थित होते. संचालक युवराज कदम यांनी स्वागत केले. सुनील कदम यांनी आभार मानले. (वार्ताहर)
पाण्याच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना आवर्तन द्या
By admin | Published: November 11, 2015 10:03 PM