सांगली : जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांचे निवृत्तिवेतन तब्बल तीन आठवडे उशिरा आले. गुरुवारी (दि. २४) बॅंक खात्यांवर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने निवृत्तांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या महिन्यात लांबलेल्या पेन्शनने निवृत्तांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडाअखेरीस निवृत्तिवेतन जमा होते. मार्चमध्ये कोरोनाची साथ पसरल्यानंतर आठवडाभराचा विलंब होत गेला. सरासरी १५ तारखेपर्यंत मिळू लागले, पण डिसेंबरमध्ये मात्र तीन आठवडे संपले तरी जमा झाले नाही. त्यामुळे निवृत्तिवेतनधारक मेटाकुटीला आले. पंचायत समिती व जिल्हा परिषदेत हेलपाटे मारू लागले.
अखेर बुधवारी शासनाकडून निधी आला. जिल्हा परिषदेने तातडीने कार्यवाही करत कोषागार कार्यालयाकडे जमा केला. गुरुवारी संध्याकाळपर्यंत निवृत्त शिक्षकांच्या बॅंक खात्यांवर पैसे जमा करण्यासाठी गडबड सुरू होती. गुरुवारी दुपारपर्यंत शिक्षकांच्या खात्यांवर पेन्शन जमा होईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे म्हणाले.
चौकट
तीन दिवस पुन्हा सुट्ट्या
शुक्रवारपासून तीन दिवस बॅंका व जिल्हा परिषदेला सुट्टी असल्याने निवृत्तिवेतन प्रत्यक्ष हातात पडण्यासाठी पुन्हा वाट पहावी लाोल. सोमवारी पेन्शनसाठी बॅंकांसमोर रांगा लावाव्या लागणार आहेत.
-------------