सांगली : रस्ते कामाचे टेंडर मिळाले असून, यात गुंतवणूक केल्यास चांगला लाभांश मिळवून देण्याच्या आमिषाने सांगलीतील तरुणाला २१ लाख ८० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी निवास सूर्याबा डोंबाळे यांनी अशोक आनंदराव शेळके (रा. वडगाव बुद्रुक (पुणे) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी निवास आणि शेळके यांची ओळख झाली होती. ओळखीनंतर शेळके याने डोंबाळे यांना पुणे जिल्ह्यातील औंध ते बाणेर या रस्ता कामाचे टेंडर मिळाले आहे. मात्र, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही यात गुंतवणूक केल्यास चांगला लाभांश तर देतोच शिवाय अन्य टेंडरही मिळवून देण्याचे सांगितले होते.
डोंबाळे यांनी विश्रामबाग चौक परिसरात संशयिताला वेळोवेळी २१ लाख ८० हजारांची रक्कम त्याला दिली. रक्कम दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे परताव्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता; मात्र रक्कमही न देता लांभाशही देण्यास टाळाटाळ होत होती. शेळके याने टाळाटाळ केल्याने डोंबाळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी संशयित शेळकेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.