सांगली : मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये किंमत असलेला मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला आहे. हुसेन कोंडीबा तांबोळी (वय 64 वर्ष), लतीफ हुसेन जमादार (वय 65) अशी अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावं आहेत.
तांबोळी व जमादार हे दोघे दुर्मिळ जातीचा मांडूळ या सापाची विक्री करत असल्याची पोलिसांना माहित मिळाली होती. पोलिसांनी दोघांकडे बोगस ग्राहक पाठवून 45 लाख रुपयांत मांडूळ सापाचा सौदा ठरवला. मांडूळ साप घेऊन खंडेराजुरी येथे दोघेजण विक्रीसाठी आल्यानंतर पोलीस पथकाने दोन जणांना 3 किलो वजनाच्या मांडूळ सापासहीत ताब्यात घेतले.
सापाच्या तस्करीप्रकरणी तांबोळी व जमादारविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व मांडूळ साप वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. सापाची तस्करी करणाऱ्या टोळीचा सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.