ठळक मुद्देचौकशीसाठी उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या चारही प्रभाग समितीतील रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी ६० लाखाचा निधी मंजूर होता. त्यापैकी केवळ पंधरा लाखाचा निधी शिल्लक असून उर्वरित ४० लाखाचे पॅचवर्क झाल्याचा दावा प्रशासनाने मंगळवारी स्थायी समिती सभेत केला. त्यावर नगरसेवकांनी, कोठे पॅचवर्क केले, असा सवाल करीत, पॅचवर्कच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केला. या कामाच्या चौकशीसाठी उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचे आदेश सभापती संगीता हारगे यांनी दिले. सभापती हारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. या सभेत महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सव तोंडावर असून शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नाही. पॅचवर्कच्या कामासाठी प्रशासनाने काय केले, असा सवाल नगरसेवकांनी केला. त्यावर बांधकाम विभागाकडून खुलासा करण्यात आला. चार प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी पंधरा लाखाचा निधी पॅचवर्कसाठी दिला होता. त्यात प्रभाग समिती दोन व तीनमधील निधी संपला असून, प्रभाग एकमध्ये अडीच लाख व प्रभाग चारमध्ये साडेबारा लाखाचा निधी शिल्लक असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. प्रशासनाच्या खुलाशानंतर नगरसेवक संतोष पाटील, दिलीप पाटील, प्रदीप पाटील, शिवराज बोळाज यांनी, पॅचवर्क कोठे केले आहे ते दाखवा, असे आव्हान दिले. दरवर्षी प्रत्येक प्रभाग समितीत रस्त्यांच्या पॅचवर्कवरील १५ लाखाचा निधी गायब होतो. यंदा तर प्रशासनाने पॅचवर्कसाठी निधीच दिला नाही. सध्याचा मंजूर निधी हा गतवर्षीचा आहे. प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. पॅचवर्कचा ४० लाखांचा निधी गायब झाला असून, या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. सभापती हारगे यांनी उपायुक्तांना चौकशीचे आदेश देत, पुढील सभेत अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यामुळे पुढील सभेत सादर होणाºया अहवालाकडे आता सदस्यांचे लक्ष लागले आहे. हा विषय आता चर्चेचा ठरणार आहे. दोन रस्त्यांवर : ४५0 खड्डेमंगळवार बाजार ते अहिल्यादेवी होळकर चौक व लक्ष्मी देऊळ ते चैत्रबन नाला या दोन रस्त्यांवर ४५० खड्डे पडल्याचे नगरसेवक संतोष पाटील यांनी सभेत सांगितले. ते म्हणाले की, या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना, प्रशासन झोपा काढत आहे. सामाजिक संघटना खड्डे मुजविण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्याचीही दखल घेतली जात नाही. या दोन्ही रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी ना हरकत दाखला दिला आहे. गेल्या वर्षभरात रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. महापालिकेनेही हा रस्ता मंजूर केला आहे. बांधकाम विभाग रस्ता करणार नसेल, तर महापालिकेने तो करावा. सध्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उकरून त्याची लेव्हल करावी, अशी मागणी केली. त्यावर उपायुक्तांनी, गुरुवारपासून काम सुरू करण्याची ग्वाही दिली. पगारापुरतेच प्रशासन : बोळाजसांगलीतील मारुती रोड, हरभट रस्ता, बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. कोठेही हातगाड्या लागतात. कोठेही व्यवसाय केला जातो. फेरीवाला धोरणाचे नियोजन करण्याची मागणी वारंवार केली, पण प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. अधिकारी महिन्याला पगार घेतात आणि घरी जातात, अशी स्थिती आहे. शहराचे विद्रुपीकरण सुरू असल्याचा आरोप शिवराज बोळाज यांनी केला. याबाबत येत्या चार दिवसात वाहतूक शाखा व महापालिकेची बैठक घेऊन नियोजन करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी दिले. रस्ते पॅचवर्कच्या कामात ४० लाखांचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:08 AM