सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मृलन पथकाने हटवल्याने सोमवारी (16 एप्रिल) सकाळी सांगलीतील आंबेडकरनगरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी दोनशेहून अधिक जमावाने पालिकेवर हल्ला करुन प्रभाग समिती एकच्या कार्यालयाची तोडफोड केली. घोरपडे यांना बेदम मारहाणही केली. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. यानिमित्त आंबेडकरनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे फलक लावण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे हे फलक जप्त करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी विरोध केला. यातून त्यांचा घोरपडे यांच्याशी जोरदार वाद झाला. कार्यकर्त्यांनी एवढ्या रात्री का आला आहात? ही कारवाई करण्याची वेळ आहे का? असा जाब विचारला. त्यावेळी घोरपडे यांनी ‘मला आयुक्तांचे आदेश आहेत’, असे सांगितले. त्यानंतर घोरपडे यांनी फलक जप्त केला. पण कार्यकर्त्यांनी पुन्हा आंबेडकरांचा फलक लावला. त्यानंतर घोरपडे पुन्हा फलक जप्त करण्यासाठी गेल्याने तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी घोरपडेंना पिटाळून लावले.
घोरपडे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आंबेडकरनगरमधील दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महापालिकेकडे धाव घेतली. पालिकेतील प्रभाग समिती क्रमांक एकच्या कार्यालयावर हल्ला केला. तेथील खुर्चांची मोडतोड केली. खिडक्यांचा काचा फोडल्या. घोरपडे यांनी शोधून बेदम मारहाण केली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढून पालिकेला कुलूप ठोकले. पालिकेला चारही बाजूने पोलिसांनी वेढा दिला आहे. दोनशेहून अधिक पोलीस तैनात केले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली होती. कर्मचारी आक्रमक अतिक्रमण निर्मृलन पथकाचे प्रमुख घोरपडे यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी कर्मचा-यांनी मागणी केली. दरम्यान तोडफोड व घोरपडे यांना मारहाणप्रकरणी पालिका प्रशासनाच्यावतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाणार आहे.